नाशिककरांचा एल्गार; रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार 

नाशिककरांचा एल्गार; रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार 

नाशिक l प्रतिनिधी: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे चालू असून याकरिता ठिकठिकाणी खोदकाम, रस्ते बनविणे, पाईपलाईन टाकणे अशा एक ना अनेक कारणांमुळे त्यातच गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळांतील रस्त्यांपर्यंत ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचारी त्रस्त झाले आहेत.

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आता नाशिककर आक्रमक झाले असून, शहर ‘खड्डेमुक्त’ करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत एका मोठ्या जनआंदोलनाला सुरुवात होणार आहे.

प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र संताप

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होते आणि महापालिकेकडून फक्त वरवरची डागडुजी केली जाते. अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे काही दिवसांतच खड्डे पुन्हा उघडे पडतात. यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून नागरिकांचे आरोग्य, वेळ आणि वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार निवेदने देऊनही महापालिका प्रशासन ढिम्म राहिल्याने अखेर नागरिकांना रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे.

आंदोलनाचे स्वरूप आणि रूपरेषा

नाशिककरांनी खड्डे मुक्त व सुरक्षित रस्ते यासाठी जन आंदोलनाचा इशारा दिला असून या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीच्या आयोजन करण्यात आले असून उद्या शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वा नाशिकची ग्रामदेवता श्री कालिका मंदिर येथे पार पडणार असून राजकीय पक्ष, विचारधारा आणि मतभेद बाजूला ठेवून नाशिकच्या हितासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन ‘आम्ही नाशिककर’ च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *