दशक्रिया विधीच्या निमित्ताने आरोग्याचा संदेश: डॉ. हिरालाल पवार यांचे ‘आरोग्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान

दशक्रिया विधीच्या निमित्ताने आरोग्याचा संदेश: डॉ. हिरालाल पवार यांचे ‘आरोग्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान

नाशिक (विशेष प्रतिनिधी):

दुःखाच्या आणि शोकाकुल प्रसंगी केवळ पारंपरिक विधी न करता, समाजाला उपयोगी पडेल असा आरोग्याचा विचार देणे ही खऱ्या अर्थाने दिवंगत आत्म्यास दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ठरते. असाच एक कौतुकास्पद व वेगळा उपक्रम कातकाडे कुटुंबियांकडून करण्यात आला. दिवंगत प्रभाकर रामचंद्र कातकाडे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांचे ‘आरोग्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. हिरालाल पवार यांनी मानवी जीवन, बदलती जीवनशैली आणि आरोग्याचे महत्त्व यावर अत्यंत सोप्या व मार्मिक शब्दांत प्रकाश टाकला.

_”माणूस आयुष्यभर संपत्ती आणि इतर गोष्टींमागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे,” असे डॉ. पवार यांनी आपल्या व्याख्यानेच्या सुरुवातीला स्पष्ट केले._

*यावेळी त्यांनी आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले*

– बदलती जीवनशैली व आजार: आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात अनियमीत आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारखे आजार लहान वयातही उद्भवत आहेत.

– आहाराचे नियम: प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळून पारंपरिक, सकस आणि संतुलित आहाराचा दैनंदिन जीवनात समावेश करावा.

– व्यायाम आणि मानसिक आरोग्य: दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा कोणताही शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि पुरेशी झोप घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

– नियमित आरोग्य तपासणी: वयाच्या चाळीशीनंतर वर्षातून किमान एकदा तरी प्रत्येकाने आपली पूर्ण आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे, जेणेकरून संभाव्य आजारांचे वेळेत निदान होऊ शकेल.

समाजासाठी एक नवा आदर्श

दशक्रिया विधीसारख्या शोकाकुल वातावरणात नेहमीच्या अंधश्रद्धा किंवा केवळ कर्मकांडांना फाटा देऊन, उपस्थितांच्या जीवनाला दिशा देणारा हा आरोग्यविषयक उपक्रम उपस्थितांचे मन जिंकून गेला.

कातकाडे कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांना थारा न देता वैचारिक परिवर्तनाची नवी पहाट आणणारा ठरला आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी डॉ. हिरालाल पवार यांचे प्रबोधनात्मक विचारांबद्दल आभार मानले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा एक आदर्श पायंडा असल्याचे मत व्यक्त केले.

“मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे, पण गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी जपताना आपण जिवंत माणसांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार केला पाहिजे. या विचारातूनच वडिलांच्या दशक्रिया विधी कर्मकांडांना फाटा देऊन आरोग्यावर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.”

— नितीन कातकाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *