नाशिक: दि. १४ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिनाच्या गौरवशाली पर्वावर महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोविंद जुंदरे यांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ बहाल करण्यात आले. या सन्मानामुळे रायगड जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव शिवडे, ता. सिन्नर येथे आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवाजी जुंदरे यांनी सन १९९० मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कर्तव्यनिष्ठा, धाडस, संयम आणि उत्कृष्ट तपासकौशल्याच्या बळावर त्यांनी पोलीस सेवेत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक संवेदनशील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती, जातीय दंगली, दरोडे, खून, घरफोडी तसेच विविध विशेष मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सन १९९२ मध्ये बाबरी मशीद प्रकरणानंतर नाशिक व मालेगाव येथे निर्माण झालेल्या संवेदनशील आणि तणावपूर्ण परिस्थितीत त्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर सन २००३ मधील विजयादशमी-दसरा मैदान परिसरातील जातीय तणाव, मालेगाव बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि विविध धार्मिक सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कोविड-१९ महामारीच्या काळात देखील त्यांनी उत्कृष्ट बंदोबस्तासह जनसेवेचे कार्य प्रभावीपणे पार पाडले. निफाड तालुक्यात दरोडेखोरांच्या टोळ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवायांमध्ये नागरिकांच्या सहकार्याने फासेपारधी समाजातील आरोपींना अटक करण्याच्या मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक येथे कार्यरत असताना हरसूल परिसरातील जातीय तणावाच्या घटनांमध्ये तसेच सन २०१६ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी विशेष कामगिरी केली. नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि घोटी परिसरातील विविध गावांमध्ये समन्वय बैठका आयोजित करून सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
गुन्हे शाखेतील सेवेदरम्यान वणी, घोटी, इगतपुरी, वाडीवरे आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील खून, दरोडे व घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उल्लेखनीय योगदान दिले.
सन २०२३ मध्ये खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक चालकांना अडवून मारहाण व लूट करणाऱ्या जगदीश उर्फ लांड्या लक्ष्मण पवार टोळीला अटक करण्याच्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जुंदरे यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचबरोबर कारगाव, माडप, कलोते व वावोशी परिसरातील खून प्रकरणे, दंगली, घरफोडी आणि चोरीच्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
पोलीस सेवेसोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. चौक दुर्गक्षेत्र परिसरात लोकवर्गणीतून भव्य इमारत उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, तसेच खालापूर पोलीस ठाणे परिसरात भव्य दत्त मंदिर उभारण्याच्या कार्यातही त्यांनी योगदान दिले. शांत, संयमी, निर्व्यसनी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते नागरिकांमध्ये लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये पोलीस महासंचालक पदक (२०१९), भारत सरकारचे राष्ट्रपती पदक (२०२४) आणि रायगड रत्न पुरस्कार (२०२६) यांसह अनेक सन्मानांचा समावेश आहे.
आपल्या यशस्वी सेवाकाळात तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते, बी. जी. शेखरपाटील, आर. एल. पोकळे, अर्जुन भोसले, तसेच पोलीस अधीक्षक रवींद्र सिंगल, कृष्ण प्रकाश, मिलिंद भारंबे, आरती सिंह, संजय दराडे, अंकुश शिंदे आणि शहाजी उमाप यांच्यासह रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे यांनी नमूद केले आहे.
याशिवाय रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतुल झेंडे, विक्रम कदम, विशाल नेहुल तसेच विविध वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने आपली कर्तव्यपूर्ती अधिक प्रभावीपणे करता आली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अति उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल रायगड व नाशिक जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोविंद जुंदरे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या या यशामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
