अजय देवगणने मुलगा युगसोबत घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गर्दी नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त

नाशिक: पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने नाशिकमधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. या वेळी त्याचा मुलगा युग देवगणदेखील सोबत होता. बाप-लेकाने मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक करून भगवान महादेवाचे आशीर्वाद घेतले.  कडक बंदोबस्तात पूजा-अभिषेक श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. अजय देवगण येणार असल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. अजयने मुलासह गाभाऱ्यात जाऊन पूजा आणि जलाभिषेक केला. दर्शन घेतल्यानंतर अजयने मंदिराचे मुख्य पुजारी आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यानंतर त्याने त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाला भेट देऊन विश्वस्तांशी चर्चा केली.

मुलाचा हात धरून गर्दीतून वाट अजय देवगण मंदिरात आल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर चाहत्यांची मोठी तोबा गर्दी जमली होती. पूजा संपवून बाहेर पडताना अजय आपल्या मुलाचा (युग) हात घट्ट धरून सुरक्षारक्षकांच्या कड्यांमधून सुरक्षितपणे गाडीच्या दिशेने जाताना दिसला. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चित्रपटांवरही शिवभक्तीचा प्रभाव अजय देवगणची भगवान शिवावर अथांग श्रद्धा आहे. तो वारंवार देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला जात असतो. यापूर्वी ‘दृश्यम २’ या चित्रपटाच्या यशानंतर त्याने वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आशीर्वाद घेतले होते. त्याच्या ‘शिवाय’ (२०१६) आणि ‘भोला’ (२०२३) या चित्रपटांमध्येही महादेवाचे रूप आणि शिवभक्तीचा स्पष्ट प्रभाव दिसून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *