सैनिकांना राख्या पाठविण्याचे आंतरराष्ट्रीय सायकलपटू रत्नाकर शेजवळ यांचे विद्यार्थिनींना भावनिक आवाहन
नाशिकरोड : “एक धागा प्रेमाचा, भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा” तसेच “डाक सेवा, जनसेवा” हा प्रेरणादायी संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी नाशिकमध्ये विशेष सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. या रॅलीला नाशिकमधील सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ७ वाजता रेल्वे डाक सेवा (आरएमएस) कार्यालयातून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप के. जे. मेहता हायस्कूल येथे करण्यात आला. भारतीय डाक विभागाचे आंतरराष्ट्रीय सायकलपटू रत्नाकर शेजवळ यांच्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सायकलप्रेमींनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. के. जे. मेहता हायस्कूल येथे विद्यार्थिनींशी संवाद साधताना रत्नाकर शेजवळ यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना तसेच ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांना नाशिक शहरातून विक्रमी संख्येने राख्या पाठविण्याचे आवाहन केले. या उपक्रमातून सैनिकांचे मनोबल वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गरुडझेप प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. संदीप भानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील शिस्त, समाजसेवा आणि देशभक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला रॉयल रायडर्सचे प्रमुख डॉ. आबा पाटील, प्राचार्य सोनवणे सर, बालकृष्ण वेताळ, रमेश धोत्रे, अमित मंडपे, माधवराव पवार, शहाणे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक सायकलपटू उपस्थित होते. ही सायकल रॅली सुरक्षित व यशस्वी करण्यासाठी ओम सोनवणे, मंगेश म्हस्के आणि महेश भदरगे यांनी विशेष मेहनत घेतली.
