इंदिरानगर येथील के. बी. एच. विद्यालयात विद्यार्थ्यांचा गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदिरानगर: येथील के. बी. एच. विद्यालय, वडाळा येथे ‘दप्तरमुक्त शनिवार’ आणि ‘राष्ट्रीय हरित सेना’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शाडूच्या मातीचा व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी साकारल्या. सदर कार्यशाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश लिंडाईत, पर्यवेक्षक महेंद्र बाविस्कर आणि कलाशिक्षक एस. आर. पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पार पडली. कलाशिक्षकांनी विद्यार्थ्यांना माती कालवण्यापासून ते मूर्तीला सुटसुटीत व सुबक आकार देण्यापर्यंतचे तंत्र सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उपशिक्षिका एल. एम. पवार, सुषमा मराठे, सुचेता मुठेकर तसेच निलेश साबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळेचे सर्व शिक्षक, पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *