Google Pay चे ‘Pocket Money’ फीचर: स्कॅम की सुरक्षित नवी सुविधा?

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक | प्रतिनिधी

डिजिटल व्यवहार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Google Pay (GPay) ने “Pocket Money” हे नवे फीचर सुरू केले असून, सोशल मीडियावर याबाबत स्कॅम असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, हे फीचर पूर्णपणे अधिकृत व सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

“Pocket Money” हे फीचर UPI Circle संकल्पनेवर आधारित असून, यामध्ये एक मुख्य वापरकर्ता (Primary User) आपल्या बँक खात्याशी जोडलेला असतो. तो आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मुलांना (Secondary User) पेमेंट करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. विशेष म्हणजे, Secondary User कडे स्वतःचे बँक खाते नसले तरी तो UPI द्वारे व्यवहार करू शकतो.

या सुविधेमध्ये मुख्य वापरकर्त्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची मुभा दिली जाते. तो व्यवहारांची मर्यादा निश्चित करू शकतो तसेच प्रत्येक व्यवहाराला मंजुरी देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरक्षित पद्धतीने पार पडतात.

नवीन फीचर असल्यामुळे “बँक खात्याशिवाय व्यवहार” या मुद्द्यावरून काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, व्यवहारासाठी वापरली जाणारी रक्कम ही मुख्य वापरकर्त्याच्या खात्यातूनच वळती होत असल्याने कोणताही फसवणुकीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या सुविधेमुळे मुलांना डिजिटल व्यवहाराची सवय लावणे, तसेच घरगुती खर्चाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *