नाशिक : गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे १२ एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. Round Table India आणि Ladies Circle India यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात लहान मुलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांनी खेळ, स्पर्धा आणि सर्जनशील क्रियाकलापांमध्ये सहभागी होत मनसोक्त आनंद लुटला. यासोबतच पालकांनाही मनोरंजनाचा आनंद घेत कुटुंबासह दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळाली. या उपक्रमाचे संयोजन ऋतू वैश्य आणि मोहेना चड्ढा यांनी केले. ‘फ्रीडम थ्रू एज्युकेशन’ हे राऊंड टेबल इंडियाचे प्रमुख ध्येय असून प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेरणादायी व दर्जेदार शिक्षणाची सुविधा मिळावी, यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. १९९८ पासून वंचित घटकांसाठी शालेय पायाभूत सुविधा उभारण्याच्या माध्यमातून संस्थेने मोठे योगदान दिले आहे. आजपर्यंत १० हजारांहून अधिक वर्गखोल्या उभारण्यात आल्या असून, ११ दशलक्षांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. १९२७ साली इंग्लंडमधील Norwich येथे सुरू झालेली राऊंड टेबल चळवळ आज ५२ हून अधिक देशांमध्ये विस्तारली आहे. अ-राजकीय आणि अ-धार्मिक भूमिका जपत, मैत्री, नेतृत्व आणि समाजसेवा या मूल्यांच्या माध्यमातून ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य करत आहे.