🔴 नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; दुपारी ३ नंतर ‘डेंजर झोन’ घोषित होण्याची शक्यता
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; विभागीय अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरद्वारे सूचना देण्याचे आदेश
नाशिक बातमी |
प्रतिनिधी : जगदीश वाघ
नाशिक, दि. २३ जुलै : नाशिक शहर आणि धरण परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज दुपारी १२.०० ते ३.०० या कालावधीत परिस्थिती धोकादायक होण्याचा इशारा देण्यात आला असून, पाऊस कायम राहिल्यास दुपारी ३.०० नंतर परिसर ‘डेंजर झोन’ म्हणून घोषित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने सर्व विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तसेच नदीकाठच्या भागात प्रत्यक्ष पाहणी करून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या भागातील नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि विभागीय कार्यालयांनी समन्वयाने मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि साधनसामग्री सज्ज ठेवून त्याबाबतचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
⚠️ नागरिकांसाठी आवाहन
नदी, नाले व धरण परिसरात जाणे टाळा.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
प्रतिनिधी : गडवाट परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती अत्यंत आदर्श, संस्कारप्रधान आणि ऐतिहासिक जाणीव जागवणाऱ्या पद्धतीने साजरी करत सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श…
प्रतिनिधी:/ युनिट दाेनच्या पथकाने दुकानदारांना गुटखा विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय पानटपरीचालकावर कारवाई करून त्याला अटक केलेली आहे. त्याच्या अधिक तपास…