अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाऊंडेशनची मायेची साथ; दिंडोरीत शैक्षणिक साहित्य, छत्री-रेनकोट वाटप

अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाऊंडेशनची मायेची साथ; दिंडोरीत शैक्षणिक साहित्य, छत्री-रेनकोट वाटप

प्रतिनिधी :/ अनाथ व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शैक्षणिक साहित्य व छत्री-रेनकोटची मायेची साथ नमस्ते नाशिक फाऊंडेशनचा दिंडोरी येथे प्रेरणादायी उपक्रम पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या अनेक अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाइतकीच दैनंदिन गरजांचीही मोठी आव्हाने असतात. अंगावर पावसाचे थेंब झेलत, अनेकदा छत्री किंवा रेनकोटच्या व शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शाळेत जाणे कठीण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाऊंडेशनने मायेची आणि सामाजिक बांधिलकीची छत्रछाया दिली. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या ब्रीदवाक्यानुसार कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या वतीने दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब, अनाथ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्री व रेनकोटचे व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही अडचणीमुळे खंड पडू नये आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक व दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य मिळावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांसाठी एक छत्री किंवा रेनकोट ही केवळ वस्तू नसते, तर ती पावसातही शिक्षणाची वाट न सोडण्याची ताकद असते. अशा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद पाहून उपस्थितांचे मनही भावूक झाले. प्रास्ताविकात प्राचार्य शरद शेजवळ यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सहकार्याची माहिती दिली. नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या मदतीबद्दल त्यांनी आभार व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि शिक्षणाची प्रेरणा अधिक दृढ होते, असे सांगितले. नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल देव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत हास्य योगाचे महत्त्व व त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष हास्य योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. सुरक्षिततेची जाणीव, स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि कोणत्याही अनुचित प्रसंगी विश्वासू व्यक्तीशी त्वरित संवाद साधण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता आणि सुरक्षिततेबाबतची जाणीव अधिक दृढ झाली. दिंडोरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा अरणे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सामाजिक जनजागृती तसेच पोलिसांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पोलीस मित्र’ उपक्रमाची माहिती देत सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले.वाहन निरीक्षक सागर विश्वासराव यांनी रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम, वाहतूक दिशादर्शक फलक आणि त्यांचे पालन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. सतीश शिंपी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिकांना विविध आरोग्यसेवा व उपचार उपलब्ध असून, पालक व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. अध्यक्षीय मनोगतात म.वि.प्र. समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य जितके महत्त्वाचे आहे, तितक्याच त्यांच्या दैनंदिन गरजाही महत्त्वाच्या आहेत. पावसाळ्यात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्री व रेनकोट उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या शिक्षणप्रवासाला प्रत्यक्ष बळ देणे होय. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने आपल्या परीने गरजू व अनाथ बालकांच्या शिक्षणासाठी पुढे यावे. एका विद्यार्थ्याला दिलेली छोटीशी मदतही त्याच्या आयुष्याला मोठी दिशा देऊ शकते, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात श्री. संतोष कथार यांनी नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या कार्याचा व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुदर्शना बर्डे यांनी केले, तर नेहा देशमुख यांनी आभार मानले.

गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा आणि त्यांच्या शिक्षणप्रवासाला आधार देणारा हा उपक्रम अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला. ‘गरजूंच्या आयुष्यात मदतीचा हात म्हणजेच खऱ्या अर्थाने माणुसकी’ या भावनेचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा एकदा आला कार्यक्रमाप्रसंगी म.वि.प्र. समाजाचे संचालक मा. प्रवीण नाना जाधव, नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. सतीश शिंपी, प्रसिद्ध उद्योजक समीर मालपुरे, वाहन निरीक्षक सागर विश्वासराव, दिंडोरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा अरणे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल दादा देशमुख, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय अण्णा जाधव, नगरसेवक सुजित आप्पा मुरकुटे, प्राचार्य शरद शेजवळ, संतोष कथार, सूत्रसंचालिका सुदर्शना बर्डे, यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *